रोपे तयार करणे: चांगल्या जातिवंत पुष्कळ फळे देणाऱ्या झाडाच्या पूर्ण पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुऊन स्वच्छ करून व सावलीत वाळवून साठवून ठेवतात. रोपे करण्याकरिता ताजे बी नेहमी चांगले असते. लागवडीच्या वेळेच्या आधी सु. दोन महिने रोपांसाठी बी पेरतात. एक हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी रोपे तयार करावयाला २५० ग्रॅ. बी पुरेसे होते. बी सामान्यतः गादी वाफ्यांत लावतात. रोपे ९ – १२ सेंमी. उंचीची झाल्यावर ती वाफ्यांतून काढून तयार केलेल्या जमिनीत कायम जागी लावतात. दोन खड्ड्यांमध्ये २-३ मी. हमचौरस अंतर ठेवून रोपे लावतात. रोपाच्या अवस्थेत नर आणि मादी असा भेद ओळखता येत नाही. त्यामुळे लावलेल्या रोपांमधून ४०–६० टक्केच मादीची झाडे निघतात. बाकीची नरझाडे असतात. नरझाडाला फळे येत नाहीत म्हणून ठराविक क्षेत्रातील उत्पन्न कमी येते. हे टाळण्याकरिता एकेका आळ्यात (खड्ड्यात) दोन-तीन रोपे लावतात. रोपे वाढून त्यांना फुले आली म्हणजे नर आणि मादी असा भेद ओळखता येतो. तेव्हा सबंध बागेत दोन-चार नराची झाडे ठेवून बाकीची नराची झाडे तोडून टाकतात. त्यामुळे त्या लागवडीत कमीतकमी निग्म्यापेक्षा अधिक मादी झाडे मिळतात.
धन्यवाद मित्रांनो🙏🙏
0 Comments